कुलकर्णी चौकातला देशपांडेमध्ये राजेश श्रृंगारपुरे दिसणार कुलकर्णीच्या भूमिकेत
 
 
 
 
 
 
 
 
पुणे:-स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित कुलकर्णी चौकातला देशपांडेसिनेमा काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात सई ताम्हणकर प्रमुख भूमिका साकारत आहे आणि सईसोबत अभिनेते राजेश श्रृंगारपुरे आणि निखिल रत्नपारखी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
त्यांच्या भूमिकेविषयी सांगताना राजेश श्रृंगारपुरे यांनी म्हटले की, मी साकारलेल्या पात्राचे नाव आहे सतिश कुलकर्णी जो एका मुलाचा बाबा आहे. बायको नसल्यामुळे तो आणि त्याचा मुलगा एवढंच त्यांचं कुटुंब आहे. मुलाला काय हवं नको ते सर्वकाही बघतो आणि दोघांमध्ये वडील-मुलाचं छान बाँडिंग आहे. आणि त्याच्या आयुष्यात अशी एक स्त्री येते जिच्याशी मैत्रीचं आणि आपुलकीचं नातं तयार झालेलं असतं आणि ती स्त्री म्हणजे सई ताम्हणकर.
सिनेमाच्या माध्यमातून दाखवली जाणारी कथा ही फार कौटुंबिक आहे. सध्या आपली लाईफस्टाईल, विचार अधिक प्रमाणात पुढारलेले आहेत. सध्याच्या या पुढारलेल्या विश्वामध्ये अनेकांची विचार करण्याची पध्दत बदलत गेली आहे. कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्ती आधार शोधत असतो...एक भावनिक आधार. कोणी तरी आपल्याला समजून घेईल असं अनेकांना वाटत असतं. असाच एक इमोशनल आधार माझ्या आणि सई ताम्हणकरने साकारलेल्या पात्राच्या आयुष्यात येतो आणि दोघांसाठीही तो महत्त्वाचा असतो. आम्हा दोघांची ओळख फार जुनी नसली आणि संबंध जरी पूर्वीपासूनचे नसले तरी अचानक झालेल्या भेटीमुळे आमच्यातील नाते हे हळूहळू फुलायला लागते, असे राजेश यांनी कथेविषयी आणि त्यांच्या पात्राविषयी सांगितले.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि सह-कलाकार सई ताम्हणकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना त्यांनी म्हटले की, गजेंद्र अहिरे आणि माझी खूप जुनी ओळख आहे. या सिनेमाच्या पूर्वी त्यांच्यासोबत काम करण्याचा कधी योग आला नाही पण एकमेकांविषयी आदर हा कायम होता. लेखक आणि दिग्दर्शक या नात्याने त्यांच्या स्वभावाची खासियत म्हणजे सिनेमाची स्क्रिप्ट ही त्यांच्या डोक्यात आणि लेखणीत अगदी एकदम पक्की तयार असते. त्यांच्या सेटवर जाणं म्हणजे आपण आपलं माईंड हे कायम अलर्ट ठेवण्यासारखं आहे. एकदा का हातात स्क्रिप्ट आली की दिलेल्या संवादाच्या जोडीला अजून काय वेगळं करु शकतो हे लगेच ते सूचित करतात म्हणून त्यांच्यासोबत काम करण्यास मजा येते. सई माझी सह-कलाकार आहे. पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम केलं आहे. पण तिच्यासोबत काम करताना सईचा स्वभाव समजला आणि मी मनापासून म्हणेन की सई खूप प्रोफेशनल आहे.
कुलकर्णी चौकातला देशपांडेहा कौटुंबिक सिनेमा येत्या २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. प्रशांत गोखले हे सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.