· इयत्ता 10 वी ला 43 हजार 806 परीक्षार्थी
 · कॉपीमुक्त अभियान राबविणार, 10 भरारी पथके
  परीक्षा केंद्र आवारात कलम 144 लागू राहणार



बुलडाणा : माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी च्या परीक्षेला 3 मार्च 2020 पासून प्रारंभ होणार आहे. परीक्षेमध्ये होणारे कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभाग यावर्षीसुद्धा कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणार आहे. याबाबत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व केंद्रचालकांची सभा घेण्यात आली असून शाळा-शाळांमधून पालक सभा घेवून जनजागृती करण्यात आली आहे. याबबत 11 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या जिल्हा दक्षता समितीची सभेत कॉपीमुक्त वातावरण परीक्षा पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 43 हजार 806 परीक्षार्थी असणार आहेत. त्यामध्ये नवीन परीक्षार्थी 40 हजार 336 व पुर्नपरीक्षार्थी 3470 यांचा समावेश आहे. या परीक्षेकरीता 159 परीक्षा केंद्र असणार ओहत. जनता हायस्कूल, कोथळी, ता. मोताळा हे परीक्षा केंद्र उपद्रवी केंद्र आहे.

या परीक्षांसाठी 16 परीरक्षक केंद्र आहेत. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, अमडापूर, दे.राजा, साखरखेर्डा, मेहकर, लोणार, खामगांव येथे दोन, नांदुरा, मोताळा, मलकापूर, जळगांव जामोद, शेगांव, संग्रामपूर, धाड यांचा समावेश आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 10 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. भरारी पथकामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), विशेष महिला भरारी पथक, प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचा समोवश असलेले विशेष भरारी पथक, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल विभाग), तहसिलदार व गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.
परीक्षा केंद्र आवारात कलम 144 लागू करण्यात येणार असून परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राचे 100 मीटर परीसरात पालक व अनधिकृत व्यक्तींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीस ॲक्ट युनीव्हरसिटी बोर्ड ॲण्ड ऑदर एक्झामिनेशन ॲक्ट 1982 चे कलम 8 आणि भादविचे कलम 34 (188) आणि 217 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतील. तसेच उपद्रवी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर नेमूण दिलेल्या पेपरचे दिवशी बैठे पथक स्थापित करून दररोज परीक्षेचा अहवाल जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे. या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असा निर्णयही दक्षता समितीने घेतला आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.